गणेश चतुर्थी, गणपती उत्सव 2022- महा माहिती मराठी Ganesh Chaturthi Information | ganesh chaturthi wishes in marathi

गणेश चतुर्थी- गणेशोत्सव :- ganesh chaturthi wishes in marathi (Information of ganesh chaturthi wishes in marathi) नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण ३१ ऑगस्ट २०२२ ला येणाऱ्या गणेशोत्सवाबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग या उत्सवाबाबत अधिक जाणून घेऊयात.

Lord Ganesha
Lord Ganesha | Information of ganesh chaturthi wishes in marathi

गणेश चतुर्थी- गणेशोत्सव:- Ganesh Chaturthi

गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थी पासून दहा दिवस म्हणजे अनंतचतुदर्शी पर्यंत साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशचतुर्थी म्हणतात. या दिवशी घरोघरी गणपतीची विधिपूर्वक स्थापना करतात. गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता असल्याने त्याची उपासना, पूजा दर चतुर्थीला करण्याची पद्धत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला ‘विनायकी चतुर्थी’ म्हणतात. तर वद्य चतुर्थीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणतात. संकष्टी चतुर्थीला अनेक लोक उपवास करतात. संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली, तर तिला ‘अंगारिका चतुर्थी’ म्हणतात. भाद्रपदातील गणेश चतुर्थीला ‘महासिद्धी विनायकी चतुर्थी म्हणतात.

गणेश चतुर्थी- गजाननाचा, गणपतीचा जन्म |Birth of Ganesh Chaturthi

गणेश चतुर्थी सण म्हणजेच गजाननाचा, गणपतीचा जन्मदिवस! त्याच्या जन्माबद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. एकदा पार्वती स्नान करण्यासाठी स्नानगृहात गेली असता तेथे कोणी येऊ नये याकरिता तिने आपल्या मळापासून एक मूर्ती तयार केली व तिच्यावर स्नानगृह दार रक्षणाचे काम सोपवले. पण काही वेळाने तेथे भगवान शंकर येतात, आणि ते आत जाऊ लागले पण द्वार रक्षक आत जाऊ देईना, म्हणून त्यांना अतिशय राग आला व रागाच्या भरात त्याचे डोके उडविले. तेवढ्यात स्नान करून पार्वती बाहेर आली. तिला सारा प्रकार समजताच तिने त्या मूर्तीची जन्मकथा शंकराना सांगितली. त्यावेळी पार्वतीच्या त्या द्वार रक्षकाला, तिच्या मानसपुत्रास मारल्याबद्दल भगवान शंकरांना वाईट वाटले, त्यावेळी त्यांनी आपल्या गणांना आज्ञा केली की, “जो प्रथम भेटेल, त्याचे शिर कापून आणा”. गणांना प्रथम एक मृत हत्ती दिसला. त्यांनी त्याचे शिर कापून आणले. शंकरांनी ते शिर पार्वतीच्या मानसपुत्राच्या धडास चिकटविले आणि त्याला जिवंत केले. गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजेज तोंड. पुढे भगवान शंकराने त्याला आपल्या गणांचा मुख्य केला, म्हणून त्याला गणेशजी म्हणतात.

गणपती हा सुखकर्ता आणि संकटांचा नाश करणारा विघ्नहर्ता

गणपती हा विघ्नहर्ता म्हणजेच संकटांचा नाश करणारा आणि सुखकर्ता, मंगलकर्ता, कसा आहे याबद्दलही आपल्याला कथा वाचायला मिळतात. फार वर्षापूर्वी नरांतक नावाचा एक राक्षस होता. त्याने सिंदूरपूरचे राज्य बळकावले होते. सिंदूरपूरची सत्ता आल्यावर त्याची राक्षसी प्रवृत्ती वाढत गेली. तो सर्वांना त्रास देत होता. अनेक कुमारिकांना पकडून तुरुंगात ठेवत होता. त्यांनाही तो त्रास देत असे. त्याच्या त्रासाने सगळेजण त्रासले होते. आणि म्हणून त्याच्या अत्याचारांपासून सुटका करण्याची आणि त्याला ठार मारण्यासाठी परमेश्वराने अवतार घ्यावा असे सर्वांना वाटू लागले. त्यामुळे सर्व प्रजेने आणि ऋषि-मुनींनी परमेश्वराची प्रार्थना केली व ती प्रार्थना परमेश्वराने ऐकली. कश्यप ऋषींची पत्नी अदिती हिला अत्यंत तेजस्वी मुलगा झाला. पराशरऋषीने बाळाचे भविष्य सांगितले, ‘हा बाळ पुढे सिद्धीविनायक गणाधिपती होईल. दुष्टांचा नाश करून सर्व मंगल करील. व त्याला सर्वत्र अग्रपूजेचा मान मिळेल. पुढे हा विनायक थोडा मोठा झाला. मग वेगवेगळ्या देवांनी त्याला आपल्या जवळच्या विद्या दिल्या. अश्विनीकुमारांनी त्याला आयुर्वेद दिला. शंकरांनी त्याला अस्त्रविद्या दिली. ती देत असताना पार्वतीने त्याला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळले. विद्या पूर्ण करून तो बाहेर पडला. व त्यांनतर नरांतक राक्षसाचे अत्याचार त्याच्या कानांवर आले. त्यावेळीच त्याने त्या राक्षसाला शासन करण्याचे ठरविले यासाठी त्याने गणांची सेनाही उभारली. तसेच रत्नपूरच्या काशी राजानेही त्याला फार मोठी मदत केली होती. तुरुंगातल्या कुमारिकांची सुटका करण्यासाठी ऋद्धी आणि सिद्धी या दोन शूर कुमारिकांनीही मोलाची मदत केली. त्यांच्या पृथिमा, वशिता, ईशिता, लघिमा, गरिमा, महिमा, प्रकाम्या आणि प्राप्ती अशा आठ मैत्रिणीच्या मदतीने त्याने स्त्री-सेना उभारली, आणि सर्वांनी मिळून नरांतक राक्षसावर हल्ला केला आणि त्याच्याशी युद्ध करून त्याला ठार मारले व तुरुंगातल्या मुलींचीही सुटका केली. त्याने सगळ्या गणराज्यांना संकटमुक्त केले, राज्यात स्थिरता आणली आणि सकळीकडे मांगल्य निर्माण केले. हेच विनायकाचे खूप मोठे अवतार कार्य हेच होते.

दहा दिवसांचा गणेशोत्सव- पूजा आणि उपासना

भाद्रपद शुद्ध चतुर्थी या त्याच्या जन्मदिवशी तो काशी राज्याच्या रत्नपुराहून निघाला. यामध्ये त्याने दहा दिवस प्रवास केला व सिंदूरपुरात आपल्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्याच दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते चतुर्दशी या दहा दिवसांत या गजाननाचे पूजन, उपासना होऊ लागली, हा गणपतीचा उत्सव, त्याची पूजा, उपासना दिड दिवसापासून ते दहा दिवसांपर्यंत केली जाते. गणेशोत्सव हा सण संपूर्ण भारतात आणि विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणावर साजरा होत असतो..

गणपती उत्सव संपूर्ण देशात सामाजिक दृष्टीनेही महत्वाचा

गणपती उत्सव हा धार्मिक दृष्टीनेच महत्त्वाचा आहे असे नाही, तर तो सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. गणपती उत्सव हा एक राष्ट्रीय सण झाला आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जातो. ठिकठिकाणी सार्वजनिक गणपतींची स्थापना केली जाते. नैत्रदीपक विद्युत्-रोषणाई केली जाते. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक असे भव्य देखावे उभे केले जातात.

गणेशोत्सव एक सार्वजनिक उत्सव साजरा करण्यास सुरुवात

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची सुरवात ही लोकमांन्य टिळकांनी केली. समाजात राजकीय, सामाजिक जन जागृती निर्माण करून लोकांना एकत्र आणून त्यांनी या उत्सवाचा उपयोग केला होता. लोकमांन्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून मेळावे, व्याख्याने,  यातून त्यांनी समाजजागृती केली. अशाप्रकारे  सार्वजनिक गणपती उत्सवाला सुरूवात केली.

गणपती- मंगल मूर्ती मोरया

गणपती ही विद्येची देवता, कलेची देवता. शालेय उत्सवात हस्तकला, चित्रकला, नाट्य, संगीत इत्यादी स्पर्धांमधून कलेची उपासना आपणास दिसते. तसेच गणपती उत्सवातून विविध देखावे, व्याख्याने यातून ज्ञान-संवर्धन होते. या उत्सवात गणपतीसंबंधी आणखी काही माहितीही आपण मिळविली पाहिजे. गणपतीची उपासना करणाराही एक पंथ आहे. त्याचे नाव आहे ‘गणपत्य पंथ’. पुण्याच्या  चिंचवड नावाच्या गावाजवळ एक मोरया नावाचे श्रेष्ठ साधुपुरुष होऊन गेले, त्यांनी गणपती भक्तीचा खूप प्रचार आणि प्रसार केला. त्यामुळे गणपतीस ‘मंगल मूर्ती मोरया’ या नावाने ओळखले जाते.

महाराष्ट्रतील अष्टविनायक

महाराष्ट्रातले अष्टविनायक खूपच प्रसिद्ध आहेत. त्यांना वेगवेगळी नावेही आहेत. मोरगावचा गणनायक राजमुख गणपती, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, पालीला बल्लाळेश्वर, मढला विनायक, थेऊरला चिंतामणी, लेण्याद्रीला गिरिजात्मक, ओझरला विघ्नेश्वर, रांजणगावचा गणपती, असे महाराष्ट्रात अष्टविनायक मानले जातात.

भारतीय भाषांतील विविध नावांचा गणपती

गणपती, गजानन, गणराया हा अतिशय लोकप्रिय देव आहे. भारतीय भाषांत गणेश चतुर्थीला, गणपतीला प्रदेशानुसार विविध नावे ऐकायला मिळतात. कानडीत गणेश चतुर्थीला ‘बेनकन हब्ब’ म्हणतात. तेलगूत ‘पिल्लेयर चवती’ असे म्हणतात. पिल्लेयर म्हणजे गणपती! तामीळ प्रांतात गणपतीला ‘तुंबिकाई अलवर’ म्हणजे बुद्धिमान गणपती म्हणतात. तंजावर येथील गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच त्रिचनापल्ली येथे ‘ऊच्चि पिल्लेयर’ हे गणपतीचे देऊळ फारच भव्य आणि सुंदर आहे. यावरून गणपतीची उपासना सगळीकडे कशी होते याची कल्पना येते.

गणेश उत्सव 2022 मध्ये कधी आहे?

यावर्षी गणेश  चतुर्थी उत्सवाची सुरुवात बुधवार  ३१ ऑगस्ट २०२२ रोजी होत आहे आणि अनंत चतुर्दशी रविवार ९ सप्टेंबर २०२२ रोजी होणार आहे.

गणेश चतुर्थी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

गणपत्ती बाप्पा, मोरया..!!

मंगल मूर्ती, मोरया..!!!

पुढच्या वर्षी लवकर या..!!!!

हे देखील वाचा

Leave a Comment