बैल पोळा सणाबद्दल मराठी माहिती- महामाहिती

बैल पोळा सणाबद्दल मराठी माहिती

नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा असा असणारा बैल पोळा सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Bail_Pola
Bail_Pola

बैल पोळा सण

श्रावणी अमावस्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अति-आनंदाची असते. ते या दिवशी पोळ्याचा सन साजरा करतात. कोकणात हा सण आषाढात साजरा करतात, देशावर काही ठिकाणी हा सण भाद्रपद आमावस्येलाही साजरा करतात. या सणाला ‘बेंदूर’ असेही नाव आहे.

बैल पोळा सणानिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस

बैल पोळा सणाच्या दिवशी शेतकरी बांधव सकाळीच आपल्या बैलांना तेल लावतो. त्यांना स्वच्छ आंघोळ घालतो. त्यांच्या शिंगांना रंग व बेगड लावून ते सुशोभित करतो. त्यांच्या अंगावरही रंगांनी विविध नक्षी किंवा आकृत्या काढतो, अंगावर झूल घालतो, शिंगांना बाशिंगे बांधतो, गळ्यात घुंगुरमाळा घालतो, पायांतही अशा माळा बांधतो. त्यांना सजवून झाले, की मग त्यांची पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात. संध्याकाळी वाजंत्री लावून त्यांची मिरवणूक काढतात. त्यांना देवदर्शनाला घेऊन जातात. इतर लोकही या दिवशी मातीचे बैल तयार करून त्यांची पूजा करतात व त्यांना नैवेद्य दाखवितात. अशा तऱ्हेने हा दिवस बैलाच्या पूजेचा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे.

शेतीमध्ये बैलाचे स्थान

आजही शेतकऱ्यांच्या जीवनात बैलाचे स्थान फार मोठे आहे. शेतीसाठी यंत्राचा वापर आजकाल बराच होत असला, तरी सामान्य; गरीब शेतकऱ्याला ते परवडत नाही. त्यांचे जीवन बैलांवरच अवलंबून असते. शेतीच्या सर्वच कामात शेतकऱ्याला त्याची मदत होत असते. शिवाय त्यांच्यापासून शेतीला खतही मिळते. अशा उपयोगी, उपकारी, सहाय्यकर्त्या बैलाला शेतकऱ्याने आपले दैवत मानून वर्षातून एकदा त्याला विश्रांती देणे, त्याची पूजा करणे, त्याच्याबद्दल कृतज्ञता करणे, हे अगदी योग्य आहे. त्यामुळेच अगदी प्राचीन काळापासून बैलाच्या उपासनेची प्रथा आपल्याकडे दिसून येते.

प्राचीन काळापासून विविध संस्कृतीत बैलाला महत्वाचे स्थान

मोहनजोदारो संस्कृती किती तरी प्राचीन आहे. तेथील उत्खननात बैलाची चित्रे सापडली आहेत. शंकराचे वाहन नंदी आहे; यावरूनही प्राचीन काळापासून आपण बैलांना मान देतो, त्यांना पूजनीय मानतो, असे म्हणता येईल. आपल्या देशात सिंधी, खिलारी, डांगी अशा बैलांच्या अनेक जाती आहेत. त्यांची वेगवेगली वैशिष्ट्ये आहेत. बैलपोळ्याच्या निमित्ताने आपण कृषि-जीवनातील अशी विविध माहिती मिळविली पाहिजे. खेड्यात शेतकऱ्याच्या घरी जाऊन तो सण प्रत्यक्ष अनुभवता आला, तर तो आनंद आपल्यालाही उपभोगता येईल. यासाठी आपण या दिवशी खेडेगावात गेलात, तर श्रावणातला हिरवागार निसर्ग, विविध वेली, फुले, भरून वाहणारी नदी, खळाळणारे निर्झर, ओढे, भिरभिरणारी फुलपाखरे अशा किती तरी गोष्टींचा आस्वाद घेता येईल, निसर्ग सौंदर्य पाहता येईल, ग्रामीण जीवनाची झलक अनुभवता येईल; आणि शेतकऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करणारा हा सण आपल्यावरही आनंदाची बरसात करील.

श्रावण मास आणि बैल पोळा

असा हा श्रावण! विविध सणांनी नटलेला. आपण बारकाईने पाहिले, तर श्रावणातील प्रत्येक दिवसच नव्या नवलाईचा असतो. श्रावणी रविवारी कित्येक घरी सूर्याची पूजा करतात. आदित्य राणुबाईची कहाणी वाचतात. स्त्रियांचे हे व्रत असते. श्रावणातल्या सोमवारांनाही महत्त्व आहे. या दिवशी बरेच लोक उपावास करतात आणि शंकराच्या दर्शनाला जातात. शंकराची बरीच मंदिरे डोंगरावर किंवा निसर्गाच्या कुशीत आहे. शंकराच्या दर्शनाकरिता अशा एखाद्या शिवालयात जायचे ठरविले, तर तो दिवस निसर्ग-सान्निध्यात घालवता येईल. नवीन लग्न झालेल्या मुली या दिवशी शंकराच्या देवळात जाऊन त्याची पूजा करतात अन् शिवामूठ वाहतात. मंगळवारीही एक व्रत आहेच- मंगळागौरीचे! लग्न झाल्यानंतर मुली पहिली पाच वर्षे हे व्रत करतात. शिवाची, गौरीची त्या पूजा करतात. त्या दिवशी मुली झिम्मा, फुगड्या असे विविध खेळ करून रात्र जागवतात. हास्यविनोद, गाणी, गोष्टी यांनी धमाल करतात. बुधवारी बुधबृहस्पतीची पूजा असते, तर श्रावणी शुक्रवारी मुलांना आरोग्य लाभावे, उडंद आयुष्य लाभावे, म्हणून जिवतिची (देवीची) पूजा करतात. देवीला पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवतात, सुवासिनींना जेवायला बोलवतात. शनिवारी पुन्हा अनेकजण उपवास करतात आणि मारुतीची आराधना करतात.

अशा प्रकारे श्रावणी अमावस्येत साजरा करण्यात येणारा बैल पोळा सण शेतकरी बांधवांसाठी खूप मोठा आणि आनंदाचा असा सण आहे.

Leave a Comment